Showing posts with label महान्यूज. Show all posts
Showing posts with label महान्यूज. Show all posts

Sunday, November 23, 2014

डिजीटल महाराष्ट्र


नवी दिल्ली : सन 2015 या वर्षात महाराष्ट्राला ‘डिजीटल महाराष्ट्र’ बनवू असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये हिंदुस्थान टाईम्स वृत्त समुहातर्फे आयोजित ‘देश बांधणीत नेतृत्व’ या विषयावर आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 2015 हे वर्ष डिजीटल सेवा वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्षात महाराष्ट्राला डिजीटल महाराष्ट्र बनविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. राज्य शासनाचे प्रत्येक कार्यालय हे ई-सेवेद्वारे जोडण्यात येणार आहे. डिजीटल इंडियाच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांना प्रशासनाद्वारे उत्तम सेवा मिळावी यासाठी ‘सेवा अधिकार कायदा’ अंमलात आणला जाईल, ज्याद्वारे सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व निश्चित केले जाईल. उत्तम सेवा देणे हे प्रत्येक विभागाचे कार्य असेल आणि उत्तम सेवा मिळणे हा नागरिकांचा अधिकार असेल.

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक वाढीसाठी परवान्यांच्या सुलभीकरणास सुरुवात झाली आहे. कोणत्याही उद्योग परवान्यांसाठी 1 ते 3 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात जर एखादा उद्योजक 100 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार असेल तर ‘मैत्री’ या योजनेनुसार सर्व सुविधा स्वत: शासन पुरविणार आहे. राज्य शासनातील संबंधित विभागांच्या सचिवांना उद्योग परवाने प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा आढावा दर महिन्याला आपण स्वत: घेणार आहे.

औद्योगिक वाढ, वीज व पाणी व्यवस्थापन, कृषी विकास त्याचबरोबर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण व 20 लाख घरांच्या निर्मितीचा प्रश्न या विषयांकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत असून त्यासंबंधीचे नियोजन व धोरण आखण्याची प्रक्रिया सुरु आहे. ‘मेक ईन इंडिया’ या संकल्पनेचा आदर्श समोर ठेऊन आम्ही ‘मेक ईन महाराष्ट्र’ ही संकल्पना राबविण्याचा निश्चय केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाषणानंतर एनडीटीव्हीच्या संपादक बरखा दत्त यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बरखा दत्त आणि उपस्थित मान्यवरांच्या विविध प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. एनडीटिव्हीचे एडीटर इन चिफ संजन नारायणन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

'महान्यूज' मधील मजकूर